‘काय रे, गेले दोन-तीन दिवस जीमला नाही आलास?‘ माझा प्रश्न. ‘जरा तब्येत बरी नाही रे.’ त्याने उभ्याउभ्याच उत्तर दिले. ‘ठीक आहे. जरा बसून सावकाश सांग काय होतंय ते.’ तो संकोचला. ‘नको, उभं राहूनच सांगतो.’ ‘अरे बाबा, घरी तुला घोडा म्हणतात, ते सिद्ध करायची गरज नाहीये. बस.’ मी माङ्गक विनोद केला. पण त्याचा चेहरा मात्र गंभीर झाला. ‘काय रे, काय होतय?’ ‘कसं सांगू रे? गेले तीन दिवस संडासच्या जागी प्रचंड दुखतंय, आग होते आणि थोडं रक्तपण पडतंय. मला टेन्शन आलंय. पाइल्स तर नसतील ना रे?’ अगदी काकुळतीला येऊन त्याने ‘मर्मबंधातील ठेव‘ उलगडली. त्याला धीर दिला. म्हटलं, ‘आपण आधी संडासच्या जागेची तपासणी करू. मग सांगतो तुला.’ दुखेल या भीतीने तो टाळाटाळ करू लागला, पण समजावून सांगितल्यावर तयार झाला. तपासल्याक्षणी निदान निश्र्चित झाले.
‘काही सिरियस नाही रे! दोन दिवसांत बरं वाटेल’ असं सांगितल्यावर तो रिलॅक्स झाला. नंतर येऊन सावकाश खुर्चीत बसलासुद्धा. संपूर्ण हिस्ट्री विचारल्यावर कळले की शनिवारी रात्री ऑङ्गिसमध्ये वीकेन्ड पार्टी असल्यामुळे नॉन-वेज व थोडे अपेय पान झाले. रविवारी पुन्हा नॉनवेजला पर्याय नव्हताच. सोमवार सकाळपासून त्याला त्रास जाणवू लागला. शौचास जाण्याची भावना व्हायची, पण गेल्यावर जोर करूनही अगदी थोडेसे शौचास होत असे, नंतर प्रचंड ठणका व आग होत असे. आग कमी व्हावी म्हणून मग थंडगार दही खाल्ले, पण ङ्गरक पडला नाही. मंगळवारी सुटीच घ्यावी लागली. जेवण जाईना मग अशक्तपणा येऊ नये, म्हणून चार अंडी खाल्ली. पण त्रास आणखी वाढला. दोन दिवस तळमळत काढल्यावर शेवटी तो माझ्याकडे आला. त्याला पाच दिवसांचे औषध व पथ्याची कल्पना दिली. पुन्हा असा त्रास उद्भवू नये म्हणून काय काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले. तीन-चार दिवसांनी तो जीममध्ये भेटला. दोन दिवसांतच त्याचा त्रास जवळजवळ पूर्णतः: गेला होता. आज या गोष्टीला दोन वर्ष उलटून गेली. पुन्हा त्रास झाल्यास काय काळजी घ्यायची हे माहीत असल्याने तो निर्धास्त आहे.
सतीशला झालेल्या रोगाचे नाव ‘फिशर इनऍनो’ असे आहे, ज्याला सामान्यत: ‘फिशर’ असे म्हणतात. गुदप्रदेशी कोणताही व्याधी असल्यास त्याला पाइल्स किंवा मूळव्याध म्हणण्याची लोकांमध्ये पद्धत आहे. प्रत्यक्षात गुदप्रदेशी इंटर्नल अँड एक्स्टर्नल पाइल्स, ऍनल पॉलिप, कॉन्डिलोमा, ङ्गिस्टुला, फिशर असे वेगवेगळे आजार होतात. त्यांची लक्षणे भिन्न असूनही चिकित्साही वेगवेगळी करावी लागते. ङ्गिशर या व्याधीत गुदप्रदेशी एक व्रण तयार होतो. थंडीच्या दिवसांत ओठ ङ्गुटून त्यांना चिरा पडतात, तसे या व्रणाचे स्वरूप असते. या आजारात गुदप्रदेशी कापल्याप्रमाणे वेदना होते, म्हणून याला आयुर्वेदात ‘परिकर्तिका’ हे नाव आहे. ‘चरकसंहिते’त याला ‘क्षतगुद’ म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘काश्यपसंहिता’ या स्त्रीरोग व बालरोगाशी संबंधित असलेल्या ग्रंथात गरोदर स्त्री व बाळंत झालेली स्त्री यांना हा आजार उद्भवल्यास काय विशेष चिकित्सा करावी हे सांगितले आहे.
फिशरचा व्रण गुदभागी विशिष्ट ठिकाणीच उत्पन्न होतो, ज्याला गुदप्रदेशाची रचना कारणीभूत आहे. उताणे झोपलेल्या व्यक्तीच्या गुदद्वाराची जर आपण घड्याळाशी तुलना केली, तर घड्याळ्यात ‘6’ या अंकाची जी स्थिती असते, तिथे हा व्रण बहुतांश वेळा तयार होतो. याचे मुख्य कारण म्हणजे गुदद्वाराचा हा भाग वगळता इतर सर्व भाग मांसपेशींनी आच्छादित केलेला असतो. त्यामुळे संडासच्या वेळी जोर केल्यास तयार होणारा ताण या भागावर सर्वाधिक पडतो. परिणामी मळाचे घर्षण तीव्रतेने घडते व व्रणाची निर्मिती होते. याबरोबरच दुसरी सामान्यत: आढळणारी जागा म्हणजे घड्याळातील ‘12’ या अंकाची स्थिती जी स्त्रियांमध्ये आढळते. प्रसूतीच्या वेळी बाळाचे डोके बाहेर येताना या भागातील मांसपेशींवर अधिक ताण पडून हा व्रण उत्पन्न होतो. म्हणूनच ‘काश्यपसंहिते’त गर्भिणी व प्रसूता यांच्या परिकर्तिकेसाठी केल्या जाणार्या विशेष चिकित्सेचे वर्णन आहे. या संदर्भातील एक गोेष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की आयुर्वेदानुसार सांगितलेल्या गर्भिणी परिचर्येमध्ये नवव्या महिन्यात बस्ती व पिचूधारण यांसारखे उपक्रम सांगितले आहेत, ज्यामुळे प्रसूती सुलभ होते. तसेच ङ्गिशरसारखे व्याधी टाळण्यास मदत होते. तसेच मूळव्याधीचे ऑपरेशन करताना चूक झाल्यास ङ्गिशरचा व्रण तयार होऊ शकतो, म्हणून कोणतेही ऑपरेशन प्रशिक्षित सर्जनकडूनच करवून घ्यावे.ही रोगाची प्रत्यक्ष कारणे आहेत. याव्यतिरिक्त इतर अप्रत्यक्ष कारणेही आहेत, जी तितकीच महत्त्वाची आहेत. या कारणांमुळे मळाच्या गाठी होतात. तसेच शरीरातील उष्णता वाढते, त्यामुळे रक्त दूषित होऊन गुदभागी व्रण तयार होतो.
हल्ली कच्ची कडधान्ये खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, ज्याला मराठीत ‘स्प्राउटस्’ म्हणतात. मूळ शब्द कडधान्ये असा नसून ‘कड(क)धान्ये’ असा आहे. जेव्हा या छुप्या ‘क‘शी दुसर्या दिवशी सामना होतो, तेव्हा तोंडातून ‘ब्र’सुद्धा निघत नाही. आयुर्वेदात जे पदार्थ रोजच्या रोज खाऊ नयेत, असे सांगितले आहे त्यात कडधान्यांचा समावेश होतो. पोट साङ्ग होण्यासाठी व मळाला मृदूपणा येण्यासाठी रोजच्या आहारात 35ग्रॅम ङ्गायबर असणे आवश्यक आहे. मांसाहार करणार्या व्यक्तींच्या पोटात जेमतेम 15ग्रॅम ङ्गायबर जातात. त्यामुळे सततचा मांसाहार हे बद्धकोष्ठतेस निमंत्रण ठरते. तसेच मैद्यापासून बनवलेले बिस्कीटस्, पाव, ब्रेड, नान यांसारखे पदार्थही मलबद्धता उत्पन्न करतात.
या पदार्थांशी सलगी करत असतानाच आपण स्निग्ध पदार्थ आपल्या हिटलिस्टवर ठेवले आहेत. पोटात स्नेहाचा एकही थेंब जाऊ नये म्हणून आबालवृद्ध डोळ्यांत तेल(?) घालून दक्ष असतात. ज्याप्रमाणे करीनाच्या आयुष्यातून शाहिद बाद झाला, तसेच गाईच्या तुपाला आपण आहारतज्ज्ञ हद्दपार केले आहे. त्याची जागा आता सङ्गोलाने घेतली आहे. करडईचे तेल हे मलावष्टंभ करणारे व डोळ्यांना अपाय करणारे आहे असे आयुर्वेद सांगतो. त्यामुळे आहारात स्नेह नाही; ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा यांमुळे आचारात स्नेह नाही. परिणामी रोज सकाळी संडासाच्या वेळी होणारा संघर्ष अटळ ठरतो.

चमचमीत पदार्थ खाण्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लसूण, शेंगदाणा, तिळाच्या चटण्या, लोणची, खारवलेल्या ताकातल्या मिरच्या, तिखट शेव, ङ्गरसाण, झणझणीत रस्सा, चरचरीत तरी असे पदार्थ तोंडाची आग होऊन डोळ्यांतून पाणी येईपर्यंत खाल्ले जातात. एवढे तिखट खाल्ल्यावर शरीरातील उष्णता वाढली नाही तरच नवल! काही जणांच्या बाबतीत तिखट खाण्याचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी आंबट, खारट पदार्थांनी जिभेचे चोचले पुरवले जातात. आयुर्वेदानुसार आंबट व खारट हे दोन रस तिखटापेक्षा जास्त उष्ण आहेत. त्यामुळे या पदार्थांनी शरीरातील उष्णता उलट जास्त वाढते. पाणीपुरी, चायनीज, सॅन्डवीच, टोमॅटो सूप, लस्सी, पावभाजी, सरबतं असे कधीतरी खाण्याचे पदार्थ सारखे पोटात जात असतात. दही थंड असते हासुद्धा एक गैरसमज आहे. बेकरी प्रॉडक्टस्, वेङ्गर्स, पापड, खारे शेंगदाणे, खारवलेले मासे यांमार्फत आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक मीठ आपण खात असतो. पान, सुपारी, तंबाखू, गुटका, सिगरेट, मद्यपान या गोष्टी ‘हिट अँड हॉट’ प्रवृत्तीच्या निदर्शक मानल्या जात आहेत.
हे झाले आहाराविषयी. आचाराची स्थितीही ङ्गारशी उत्साहवर्धक नाही. आजकाल आम्ही टेबलखुर्च्यांवर बसून किंवा उभे राहून जेवतो. ज्या गोष्टीला आपल्या संस्कृतीत यज्ञकर्माइतके महत्त्व दिले आहे, तो आजकाल इतर कामे करताना आटपण्याच्या दैनंदिन उपक्रम झाला आहे. आवडती सिरीयल बघता बघता, कॉम्प्यूटरवर काम करता करता, मिटिंग्ज करता करता जेवण आटपून टाकले जाते. रात्री दोन वाजता हातातोंडाची गाठ पडणारे रुग्ण आमच्या पाहण्यात आहेत. दिनचर्या इतकी अनियमित असताना संडासला मात्र ‘वन स्ट्रोक गो’ असे व्हायला हवे, अशी प्रत्येकाची माङ्गक(?) अपेक्षा असते. सूर्योदयापूर्वी दीड-दोन तास वातावरणात वातदोष प्रबळ असतो. या काळात उठून मलत्याग केल्यास सुखपूर्वक मलप्रवृत्ती होते. पण आजकाल सर्व जण ‘सूर्यमुखी’ झाले आहेत. आणखी एक सवय म्हणजे मलाचा वेग आलेला असताना लाजेमुळे किंवा इतर महत्त्वाची(?) कामे असल्याने संडासला न जाणे. नंतर जेव्हा सवड मिळते तेव्हा संडासला होत नाही. आज आरती प्रभू असते, तर त्यांना या परिस्थितीवर ‘गेले जायचे राहून…’ असे काव्य लिहावे लागले असते.
या सर्वांची निष्पत्ती मळाच्या गाठी होण्यात होते, कुंथायची सवय लागते. त्यामुळेच कधीतरी ङ्गिशर होतात. अशा रुग्णांना मलप्रवृत्तीनंतर अर्धा ते एक तास प्रचंड वेदना व दाह होतो. कधीतरी संडासला लागून रक्तही पडते. पोट साङ्ग न झाल्यामुळे पोटात वायू साठतो व पोट ङ्गुगते. त्यामुळे काहीही खाण्याची इच्छा होत नाही. तोंडाची चव जाते.
अशा वेळी पोट साङ्ग करणे, गुदप्रदेशातील वेदना व सूज कमी करणे, त्या ठिकाणची जखम भरून आणणे. अशी उद्दिष्ट्ये ठेवून औषधयोजना केली जाते. आयुर्वेदात शोधनाच्या अंतर्गत असणारी पंचकर्म चिकित्सा व शमनाच्या अंतर्गत येणारे औषधोपचार अशी दोन प्रकारची चिकित्सा करतात.
बस्ती – औषधांनी सिद्ध केलेले तेल किंवा काढे यांचा एनिमा देणे म्हणजे ‘बस्ती’. यामध्ये कंबर व ओटीपोटीच्या भागास मसाज करून नंतर एनिमा दिला जातो. ङ्गिशरच्या त्रासात तेलाच्या बस्तीमुळे त्वरित लाभ होतो. बस्तीमुळे गुदभागी होणारा ठणका व रक्तस्राव त्वरित थांबतो. तसेच मलप्रवृत्ती सहजपणे होते आणि जादूई परिणाम दिसतो. दवाखान्यात आल्यावर बसायला घाबरणारा सतीश काही वेळाने निर्धास्तपणे बसला, याचे श्रेय बस्तीला आहे. याव्यतिरिक्त पावसाळ्यात आठ दिवसांच्या बस्तीचा कोर्स करून घेतल्यास पोटाचे बहुतांश विकार दूर ठेवता येतात. पण हे उपचार प्रशिक्षित वैद्यांकडूनच करवून घ्यावेत. कारण यात काही चूक झाल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
अनुलोमन – सौम्य प्रकृतीची पोट साङ्ग करणारी औषधे म्हणजे अनुलोमक. यात बहाव्याच्या शेंगेचा उत्तम उपयोग होतो. शेंगेतील 10ग्रॅम मगज पाव लीटर पाण्यात भिजवून त्याचा एक-चतुर्थांश काढा घेतल्यास उत्तम मलशुद्धी होते. बहाव्याला आयुर्वेदात ‘चतुरंगुल‘ हे पर्यायी नाव आहे. बद्धकोष्ठ असणार्या व्यक्तींनी याचा प्रयोग केल्यास ‘स्वर्ग चार बोटे उरतो‘. इसबगोल हेसुद्धा अशाच प्रकारचे औषध आहे. यातल्या 30% ‘म्युसिलेज’ नामक चिकट पदार्थांमुळे आतड्यांच्या आतील रूक्षता कमी होऊन मूळ सुटण्यास मदत होते. यासोबत सोनामुखी, त्रिङ्गळा चूर्ण, गंधर्व, हरीतकी यांसारखी अनेक औषधे वापरली जातात. ही औषधे दीर्घ काळ घेतल्यास सवय लागते. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
व्रणरोपक औषध – ङ्गिशरमध्ये वेदना कमी करणारी, रक्तस्राव थांबवणारी आणि जखम भरून आणणारी औषधे वापरावी लागतात. सर्वसाधारणपणे वापरल्या जाणार्या वेदनाशामक औषधांनी उष्णता वाढते. त्यामुळे जखम लवकर भरत नाही. आयुर्वेद मात्र अशा औषधांनी समृद्ध आहे.
नागकेशर हे अशा प्रकारचे औषध आहे. रक्त थांबवण्यासाठी नागकेशराचा उपयोग लोण्याबरोबर करण्यास आम्ही सांगतो. लोण्यास संस्कृतमध्ये ‘नवनीत’ म्हणतात. अशा प्रकारे नागकेशर, लोणी व साखर एकत्र घेतल्यास ‘नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो’ याचा प्रत्यय येईल.
कांदा हेसुद्धा उत्तम घरगुती औषध आहे. विशेषत: पांढर्या कांद्याचा उत्तम उपयोग होतो. पांढर्या कांद्याचा रस 2 चमचे घेतल्यास ङ्गायदा होतो किंवा एक छोटा कांदा (अंदाजे 10ग्रॅम) तव्यावर भाजून तो खावा.
काळ्या मनुका हे रक्तस्राव थांबवणारे व पोट साङ्ग करणारे नैसर्गिक औषध आहे. साधारण 20-25 काळ्या मनुका पाण्यात भिजत घालून रात्री झोपण्यापूर्वी त्याचे एक कप सूप घेतल्यास पोट साङ्ग होते. आजकाल द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके ङ्गवारली जातात. म्हणून ती व्यवस्थित धुऊन व स्वच्छ पुसून घ्यावीत.
यासोबतच गेरू, वाळा, ज्येष्ठमध, उपळसरी, आवळा, डाळिंबसाल, कुडा यांच्या चूर्णाचा वापर रुग्णाची प्रकृती व इतर लक्षणांचा विचार करून आम्ही करतो.
बाह्योपचार – गुदभागी होणार्या आजारांसाठी एका मोठ्या टबमध्ये औषधांचा काढा घेऊन त्यात रुग्णाला बसवले जाते. त्यामुळे गुदभागास शेक मिळून वेदना व सूज कमी होण्यास मदत होते. गुदद्वाराचा दाह कमी व्हावी म्हणून शतधौत घृत, सर्जरस मलहर, गैरिकाद्य मलहर अशी मलमे वापरली जातात.
पथ्यापथ्य – गव्हातील कोंडा न काढता केलेली चपाती, ज्वारी, तांदूळ यांची भाकरी, भात, दुधीभोपळा, लालभोपळा, दोडका, भेंडी अशा भाज्या; दूध, लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत. सङ्गरचंद, केळी द्राक्षे, आवळा, अंजीर अशी ङ्गळे खावीत. ताक हे उष्ण असल्याने प्रत्यक्ष त्रास होत असताना घेणे टाळावे. रोज रात्री झोपताना एक कप गरम दुधात 2 चमचे गाईचे तूप घेतल्यास पोट चांगले साङ्ग होते. तसेच आतड्यांना बळ मिळते. विशेषत: वृद्ध व्यक्तींना त्याने चांगला ङ्गायदा होतो. जेवणाच्या वेळा पाळणे, मलमूत्राचे वेग आल्यावर त्यांचे विसर्जन करणे या गोष्टींकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे. वरवर पाहता साधा वाटणारा हा रोग जेव्हा त्याचा हिसका दाखवतो, तेव्हा मात्र डोळ्यांतून पाणी काढतो. म्हणूनच वर सांगितलेल्या पथ्यांचा अवलंब करून स्वस्थ राहावे हे श्रेयस्कर.
डॉ .श्री. नितिन जाधव. संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.