उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा कधी एरवीही थोडं काम केलं की आपल्याला बसावसं वाटतं. एकदम थकून गेल्यासारखं होतं. काही वेळा अंगातलं त्राण गेल्यासारखं होतं. असं होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. प्रमाणाबाहेर कष्ट करणे, पुरेशी झोप न होणे किंवा ऊन्हाचा तडाखा वाढल्यानेही असे होऊ शकते. अन्नातून पुरेसे पोषण मिळत नसेल किंवा शरीरात कोणत्या व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर हे सगळे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला थकवा येत असेल तर ही गोष्ट अंगावर न काढता वेळीच तो का येतो याचे कारण शोधून काढणे आणि त्यावर योग्य ते उपाय करणे आवश्यक असते
यासाठी वेळीच डॉक्टरांकडे जाणे आणि त्यांनी दिलेल्या तपासण्या करण्याची आवश्यकता असते. रक्त तपासण्या केल्यानंतर शरीरात ज्या घटकांची कमतरता आहे ते घटक मिळणारे पदार्थ किंवा सप्लिमेंटस आहारात वाढवावे लागतात. त्यानंतरच हा थकवा कमी होण्याची शक्यता असते. यासाठी वेळीच डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यास योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करतात. कोणत्या गोष्टींची कमतरता झाल्याने थकवा येतो आणि त्यासाठी काय करावे याविषयी समजून घेऊया...
*१. प्रोटीन्स...*
दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार, अंडी, डाळी, कडधान्ये यांसारख्या गोष्टींमधून शरीराला जास्त प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. प्रोटीन्स हा घटक शरीरात तयार होत नाही तर तो शरीराला बाहेरुनच पुरवावा लागतो. आहारात प्रोटीन्सचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
*२. लोह आणि फोलिक एसिड...*
पालेभाज्या, बाजरी, नाचणी, धान्ये, सालीसकट कडधान्ये, अंडी, बदाम, शेंगदाणे, मांसाहार, मासे यांमध्ये लोह जास्त प्रमाणात असते. तर आक्रोड, सोयाबिन, धान्ये, बदाम, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या पदार्थांमध्ये फोलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या पदार्थांचे प्रमाण आहारात वाढवल्यास शरीराचे पोषण होण्यास मदत होते आणि थकवा कमी होण्यास मदत होते.
*३. डी ३ आणि के २...*
सूर्यकिरणे ही डी ३ चा सर्वात उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे कोवळ्या उन्हात बसणे हे डी ३ मिळण्यासाठी अतिशय आवश्यक असते. यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सोयाबिन, सूर्यफुलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक यांतून शरीराला व्हिटॅमिन के मिळते. हे दोन्ही घटक कमी असतील तरीही थकवा येऊ शकतो.
*४. व्हिटॅमिन बी १२...*
शरीरातील पेशीनिर्मितीसाठी हा अतिशय आवश्यक घटक आहे. लाल रक्तपेशी तयार करण्यात बी १२ चा अतिशय महत्वाचा सहभाग असतो. यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ यांतून शरीराला बी १२ चांगल्या प्रमाणात मिळते. शरीरात ताकद राहावी आहारात या सगळ्या घटकांचा समावेश ठेवणे आवश्यक असते.
*५. पाणी...*
हा आपल्या शरीराच्या एकूण सर्व क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीरात ७० टक्के पाण्याचे प्रमाण असल्याने हे प्रमाण कमी झाले तरी आपल्याला थकवा येणे किंवा अशक्त वाटणे अशा समस्या उद्भवू शकतात.
*कुमार चोप्रा,*
*डॉ. सुनील इनामदार,