उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम

*उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम*
१) हृदयाची अकार्यक्षमता :
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ (HEART FAILURE) असे म्हणतात.
उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयाच्या विकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चारपट अधिक आहे. उच्च रक्दाबाच्या रुग्णांना हृदयशूळ (ANGINA) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.
२) मूत्रपिंडावर परिणाम : 
उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.
३) इतर दुष्परिणाम :
अति उच्च रक्तदाबामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तसेच डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष होऊ शकतो.
उच्च रक्तदाबामुळे काही रोग्यांच्या महारोहिणीचा (AORTA) काही भाग अति पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. (DISSECTING ANEURYSM), ही अत्यंत भयावह अवस्था असून कधी कधी यात मृत्यूही येऊ शकतो. रक्तदाब उच्च झाला आणि तो नीटपणे आटोक्यात राहिला नाही तर जीवनमर्यादापण कमी होऊ शकते.
अति रक्तदाबाचे निदान (DIAGNOSIS)
अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, धूम्रपान करू नये किंवा अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.
रक्तदाब मोजताना रुग्ण हा पूर्णपणे रिलॅक्स (निश्चिंत) असावा. रक्तदाब एका डॉक्टरच्या भेटीमध्ये दोनदा मोजावा, म्हणजे तपासणीच्या सुरुवातीला आणि शेवटी असे प्रत्येक आठवडय़ात एकदा किंवा दोनदा याप्रमाणे तीन आठवडे करावे. तीन आठवडय़ांतील सर्व मोजमापे जर नॉर्मलपेक्षा जास्त असतील किंवा जर अध्र्यापेक्षा अधिक मोजमापे अधिक असेल तर अशा व्यक्तींना अति रक्तदाब आहे असे निदान करण्यात येते. रक्तदाब हा फारच जास्त असेल उदा. १८०/ १२० तर अशा रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात भरती करून त्यावर औषधोपचार करावा लागतो.
* याच्या सोबतीला इसीजीमध्येसुद्धा दीर्घकालीन अति रक्तदाबाचे ठरावीक बदल होतात. त्यामुळे सर्व अशा रुग्णांना इसीजी काढणे आवश्यक असते.
* इकोकार्डियोग्राफी (ECHOCARDIOGRAPHY) या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे हृदयावरील परिणामाची नोंद घेतली जाते. यात हृदयाचा वाढलेला आकार, स्नायूंची वाढलेली जाडी, हृदयाच्या झडपांवर झालेला विपरीत परिणाम, हृदयाची कार्यक्षमता याचा समावेश होतो.
* डोळ्यांच्या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे डोळ्यावर आणि डोळ्यांच्या पटलावर (RETINA) झालेल्या परिणामांची नोंद घेतली जाते. याला FUNDOSCOPY असे म्हणतात. 
* रक्ताच्या तपासणीमध्ये किडणीवर झालेले विपरीत परिणाम याची कल्पना येते. जर अनुषंगिक अति रक्तदाब असेल तर त्या त्या अवयवाशी निगडित रक्त तपासण्या किंवा इतर अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी, सीटीस्कॅन, आयव्हीपी, अँजिओग्राफी, अ‍ॅवोटरेग्राफी, किडनीच्या रक्तवाहिनीच्या तपासण्या इत्यादीचा समावेश होतो. या तपासण्यांची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात.
अति रक्तदाबाचे उपचार
अति रक्तदाबाचा औषधोपचार हा तज्ज्ञ डॉक्टराकडूनच घ्यावा. एकदा का हा रक्तदाब नॉर्मल (योग्य) पातळीवर आला की मग वाटले तर रक्तदाबाचे मोजमाप करण्यासाठी नियमितपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यास काही हरकत नाही. मध्ये मध्ये हृदयतज्ज्ञ डॉक्टरकडे जाणे योग्य आहे.
वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे तज्ज्ञ डॉक्टरचे काम आहे.
रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.
१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा- मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.
२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा- अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचा सुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.
३) वजन कमी करणे- वजन कमी केल्याने थोडय़ा फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते. चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानीकारक होऊ शकतो.
स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा. 
* पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.
* दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.
* केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.
* मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.
* कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.
४) व्यायाम आणि योगासने :
* वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
* भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे हे व्यायामाचे प्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत (या सर्व प्रकारांना आयसोटोनिक ISOTONIC EXERCISE असे म्हणतात). यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावून रक्तवाहिन्यांची RIGIDITY (कठिणीकरणाची प्रक्रिया) सुद्धा कमी होते.
* अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलण्याचे व्यायाम, दंडबैठका, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करू नयेत.
* योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी. ज्यात मस्तक खाली राहते व पाय वर असतात, अशी आसने (शीर्षांसन) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये.
‘योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.
ताण-तणाव कमी करणे
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.
नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा. अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे. कारण प्रत्येक काळय़ा ढगाला रूपेरी किनार असते. प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. म्हणजेच प्रयत्नवादी आणि आशावादी व्हावे.
क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.
मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.
दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत. आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा. मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा. परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी.
‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे. ‘HURRY, WORRY, CURRYX’ या गोष्टी आजाराला निमंत्रण देतात. या टाळण्याचा प्रयत्न करावा. या सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष दिल्यास आपण सर्व दीर्घायुषी व्हाल यात शंकाच नाही.

डॉ .श्री नितिन जाधव डोंबिवली .
9892306092

Featured Post

DR. VARMA K SREEVIRAJ DOMBIVLI INDIA


DR VARMA K SREEVIRAJ B.A.M.S G.Y.M.S Mumbai AND DR DARSHANA VARMA B.A.M.S. MUMBAI DR.VARMA AYURVEDIC MEDICINES & PANCHAKARMA CENTRE, ABOVE VARMA STORE OPP.KAILASH MANDIR LASSI SHOP NEAR RAILWAY STATION DOMBIVLI EAST THANE MAHARASHTRA INDIA 421201 MOB.NO :- Dr Varma +91 9820472331 and :- Dr Darshana Varma +91 9930644683 Online Consultation :- + 91 9619695666

Popular Posts

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
सभी सुखी होवें, सभी रोगमुक्त रहें, सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े। ॐ शांति शांति शांति॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Disclaimer

The information at any place in this website is just an informative basis as well as pure intention to create Awareness about Ayurveda , Yoga and Meditation to encourage people to adopt Ayurveda , Yoga and Meditation in their day to day lifestyle for Natural health. All the content is purely educational in nature and should not be considered medical advice. Please use the content only consultation with appropriate certified Doctor or medical or healthcare professional. This site contains External Links to third party websites ,These links are being provided as a convenience and for informational purposes only; they do not constitute an endorsement or an approval and no responsibility for the accuracy, legality or content of the external site or for that of subsequent links. Contact the external site for answers to questions regarding its content.

Total Pageviews